जीवन, एक अनुभव !

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search

गेल्या शनिवारी माझे आईवडील पुण्याला, म्हणजे आमच्या गावी गेले. त्यांना पोहोचावायला मी सपत्नीक मुंबई विमानतळावर गेलो होतो. खरे तर त्यांनी ट्रेनचीच तिकिटे काढायला सांगितली होती. पण सौ. म्हणाली, अहो त्यांची बऱ्याच वर्षांची इच्छा आहे एकदा तरी विमानाने प्रवास करण्याची, द्या काढून त्यांना विमानाची तिकिटे. आमच्या सौ ची विनंती म्हणजे माझ्यासाठी ऑर्डर असते. आणि खरे तर मलाही मनापासून तसे वाटत होते. मलाही त्यांना एकदा हा अनुभव द्यायचा होताच. मी विमानाची तिकिटे हातात ठेवल्यावर तर दोघेही प्रथम आश्चर्यचकित व मग आनंदित झाले. जणू काही त्यांची वर्षानुवर्षांची मनोकामना आता पूर्ण होत होती. ट्रेनप्रवासाची तयारी बाजूला सारून त्यांनी आता नव्याने विमानप्रवासाची तयारी सुरु केली. पिशव्यांची जागा नव्या सुटकेसेसनी घेतली. विमानतळावर प्रवेश केल्यावर अगदी सामानाच्या ट्रोलीपासून ते सामानतपासणीपर्यंत आणि आत खिडकीजवळची जागा मिळेल का याची चौकशी करेपर्यंत त्यांचा उत्साह अगदी वाखाणण्यासारखा होता. ते सर्व पाहून आम्हाला अगदी कृतकृत्य झाल्यासारखे वाटत होते. शेवटी आत जाण्याची वेळ आली तसे ते माझ्याजवळ आले. माझ्या खांद्यावर हात ठेवला व नुसतेच पाहत राहिले. “धन्यवाद”, हा एकच शब्द उच्चारून ते वळले. त्यांच्या डोळ्यातली पूर्तता आम्हाला एक वेगळेच समाधान देऊन गेली.

विमान उडाल्यावर सुन्न मनाने आम्ही घरी परतलो. डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. मन सहजच भूतकाळात गेलं. मी लहान असताना माझी कितीतरी स्वप्ने त्यांनी विनातक्रार पुरविली होती, त्यांची तशी आर्थिक परिस्थिती नसतानाही. अर्थात त्या वयात पैसा कसा येतो आणि कसा जातो हे कळत नव्हते, हि गोष्ट अलाहिदा! पण हे सर्व करताना त्यांना किती गोष्टींचा त्याग करावा लागला असेल, आपल्या किती इच्छा माराव्या लागल्या असतील? पण त्याबद्दलची कृतज्ञता कधी आम्ही व्यक्त केली ? कधी त्यांना “धन्यवाद” असे म्हणालो ? जणू काही आमच्या सर्व इच्छांची पूर्तता करवून घेणे हा आमचा जन्मसिद्ध हक्कच होता !

आज आम्ही आमच्या मुलांना आपल्या आर्थिक मर्यादेत राहून सर्वोत्तम ते देण्याचा प्रयत्न करतो. देणगीचा विचार ना करता त्यांना चांगल्या शाळा कॉलेजात घालतो. आज अकरावी बारावीच्या मुलांच्या हातात महागडे मोबाईल्स दिसतात. पण हे सर्व करत असताना एका गोष्टीची आम्हाला जाणीव होते का कि कधीकाळी आम्हाला हे सर्व देण्यासाठी आमच्या आईवडिलांनीदेखील आपली स्वप्ने पायदळी तुडविली होती ? आपल्या आकांक्षांना सुरुंग लावला होता. काबाडकष्ट केले होते. मग त्यांच्या त्या स्वप्नांना पुन्हा पंख देण्याचं, त्याचं जीवन अधिकाधिक सुखमय करण्याची जबाबदारी आमच्यातील कितीजण सक्षमपणे पार पाडतात ?

बऱ्याचदा असं होतं कि माझे आईबाबा मला काहीतरी विचारतात आणि मी क्षणाचाही विलंब न लावता पटकन काहीबाही उत्तर देतो, टाळल्यागत ! पण हेच जेव्हा माझी मुलगी विचारते, तेव्हा मात्र मी हळुवार स्वरात, थोडा विचार करून उत्तर देतो. वाटतं, नेमकं काय वाटत असेल त्यांना माझी उत्तरं ऐकून. आम्ही हे का समजून घेत नाही कि म्हातारपण म्हणजे दुसरे बालपणच ! जशी मुलांना त्यांच्या वयात समजून घेण्याची आणी त्यांची काळजी करण्याची गरज असते तशीच गरज वृध्दांना देखील असते !

माझ्या बाबांनी मला धन्यवाद दिले. पण वाटलं, त्यांचं एवढं छोटंसं स्वप्न पूर्ण करायला मला इतकी वर्षं का लागली ? मात्र आता मला माझी चूक कळली आहे. त्यांचा आयुष्यभराचा त्याग मी असा मातीमोल नाही होऊ देणार. त्यांच्या इच्छा आकांक्षा, त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मी जीवाचं रान करेन. केवळ ते आता वृद्ध झाले आहेत म्हणजे त्यांच्या आयुष्यात आता करण्यासारखं काहीच राहिलं नाही असं मानण्याची गरज नाही, व जे त्यांनी आमच्यासाठी केलं तेच आता नातवासाठीही करावं अशी अपेक्षाही बाळगण्याची गरज नाही.

जे मला समजलं ते तुम्हालाही समजू द्या !

आईवडिलांची काळजी घ्या !