सहाय्य:विक्शनरीचा परिचय
विक्शनरी हा एक मुक्त बहुभाषिक शब्दकोशाचा विकि-प्रकल्प आहे.
शब्दकोश
[संपादन]हा शब्दकोश आहे म्हणजे ह्यात शब्दांसंदर्भातील विविध प्रकारची आवश्यक ती माहिती संकलित करण्यात येत आहे. पण ह्या शब्दकोशाचे स्वरूप बहुआयामी आहे. ह्यात शब्दाचे लेखनरूप, त्याचा उच्चार, त्याच्या व्याकरणिक रूपांची माहिती, त्याचे विविध अर्थ, त्या अर्थांशी विविध संबंधांनी जोडले गेलेले अर्थ आणि त्या अर्थांचे वाचक शब्द अशा विविध प्रकारची माहिती संकलित करण्यात येत असल्याने हा शब्दकोश तर आहेच. पण त्याचा उपयोग आणि त्याची रचना ही शब्दार्थकोश, पर्यायकोश, लेखनकोश, उच्चारकोश अशा विविध प्रकारे करता येणे शक्य आहे.
मुक्त शब्दकोश
[संपादन]हा शब्दकोश मुक्त आहे. म्हणजे ह्या कोशात कोणतीही व्यक्ती संपादन करू शकते. ती नवीन नोंद तयार करू शकते किंवा आधीच असलेल्या नोंदींत सुधारणा वा बदल करू शकते. इतरांनी केलेल्या नोंदी तपासू शकते. त्यात काही भर घालू शकते किंवा आवश्यक असेल तर सकारण वगळूही शकते त्यासाठी त्या व्यक्तीने विक्शनरीच्या संकेतस्थळावर सदस्य म्हणून नोंदणी केली असलीच पाहिजे असे नाही. मात्र नोंदणी केलेली असल्यास आपण विक्शनरीत कोणती आणि किती संपादने केली. तसेच आपण संपादित केलेल्या नोंदींत इतर अनेक व्यक्तींनी कोणकोणत्या प्रकारचे बदल केले ह्याचा माग काढणे सहज शक्य होते.
हा शब्दकोश मुक्त आहे ह्याचा दुसरा अर्थ म्हणजे ह्या शब्दकोशाची सर्व सामग्री ही क्रिएटिव्ह कॉमन्सचा श्रेयनिर्देशन-समवितरण परवाना आणि ग्नू-दस्तऐवजीकरण-परवाना ह्या दोन मुक्त परवान्यांअंतर्गत मुक्त स्वरूपात उपलब्ध आहे.
विक्शनरीचे संपादन करताना घ्यायची काळजी
[संपादन]विक्शनरी हा शब्दकोश उपरोक्त अर्थांनी मुक्त असल्यामुळे विक्शनरीचे संपादन करताना पुढील काळजी घेणे आवश्यक आहे.
- विक्शनरी हा लोकसहभागावर आधारित प्रकल्प आहे. ह्यातील नव्या नोंदी लिहिणे, नोंदींचे परीक्षण करून त्यांत सुधारणा करणे, चुकीच्या नोंदी दुरुस्त करणे इ. कामे लोकसहभागातूनच होणे अभिप्रेत आहे. त्यामुळे विक्शनरीत काही दोष वा त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्याचा उपाय म्हणजे आपण त्यासाठी संपादन करणे हा आहे.
- विक्शनरीचे संपादन कुणीही व्यक्ती करणार असल्याने विविध सदस्यांच्या सहकार्यानेच ह्या नोंदी घडत जाणार आहेत. त्यामुळे सदस्यांनी परस्परांचा आदर राखून काम करणे आवश्यक आहे.
- मतभेदाचे मुद्दे असल्यास नोंदीच्या चर्चापानावर अथवा चावडीवर चर्चा करता येऊ शकते.
- नोंद करताना आपण केलेली नोंद ही अन्य व्यक्तींना संपादनासाठी मुक्तपणे उपलब्ध असणार आहे ह्याचे भान ठेवणे आवश्यक आहे.
- विक्शनरी हा मुक्त शब्दकोश असल्याने त्यात नोंदी कशा कराव्यात ह्याबाबत लवचिक धोरण अंगीारण्यात येते. मात्र लवचिक ह्याचा अर्थ विस्कळीत असा होऊ नये ह्यासाठी विक्शनरीतील इतर नोंदींचे निरीक्षण करून तसेच साहाय्याची पृष्ठे वाचून रचना समजून घेणे आवश्यक आहे. ह्या रचनेतही अर्थातच बदल सुचवता येतील.
- आपण करत असलेल्या नोंदींना आधार अवश्य द्यावेत त्यायोगे मतभेद पारदर्शकतेने सोडवणे शक्य होईल.
- विक्शनरीतील नोंदींना आधार द्यावेत पण अन्य कोशांतली वा संकतस्थळांवरची सामग्री आहे तशी इथे नकलून दिल्यास काही संदर्भात प्रतिमुद्राधिकाराचा (कॉपिराइटचा) भंग होण्याची शक्यता असते.
- हा शब्दकोश मुक्त परवान्यांतर्गत वितरित करण्यात येणार असल्याने ही सामग्री मुक्त असणार आहे. त्यासाठी ती प्रतिमुद्राधिकाराचा भंग करणारी ठरू नये. तिचा मजकूर ही तुमची स्वतःची निर्मिती असावी ह्याची काळजी घ्यावी.
बहुभाषिक शब्दकोश
[संपादन]हा कोश बहुभाषिक आहे म्हणजे ह्या कोशात एकाहून अधिक भाषांतल्या शब्दांच्या नोंदी असू शकतात. मराठी विक्शनरी हा विक्शनरी ह्या प्रकल्पाचा मराठी भाषेतील विभाग आहे. त्यामुळे ह्या कोशात नोंदीचा शब्द कोणत्याही भाषेत असला तरी त्याचे स्पष्टीकरण हे मराठी भाषेत असणार आहे.
विकि-प्रकल्प
[संपादन]मराठी विक्शनरी हा एक विकि-प्रकल्प आहे. म्हणजे हा शब्दकोश विकी ह्या प्रकारच्या आज्ञावलीच्या साहाय्याने महाजालावर वापरता येण्याजोग्या शब्दकोशाचा प्रकल्प आहे.