घरबंदी
Appearance
घरबंदी:- भाग 2 उर्फ चिंतातूर जंतू
सकाळीच पहिला फोन " स्वच्छता अभियान"चा.तिच्या स्वच्छतेच्या वेडामुळे,तिचे नामकरण झाले आहे.खूप थकलेल्या आवाजात... ती:-तुझी सगळी कामं झाली का ग ?? मी:-नाही ग, होतील हळूहळू !! ती:-थकले ग मी अगदी 🤣 मी:-अग, सावकाशीने कर की मग 😀 ती:-अग मला बाई चैनच पडत नाही 😧 मी:-तू कध्धी सुधारणार ग ?तुला कोणी जाब विचारायला येणार आहे का ? बस की जरा शांत 😝 ही आमची "अभियान" म्हणजे,टोकाची स्वच्छता.तिच्या घरी कामाला कोणी टिकत नाही.एक कणभर धूळ राहिली,तर जन्मठेप होईल,अशी सतत भीती 😀 अशीच आमची घुमाबाई !!! ती:-चैन पडतं का ग, घरी बसून ? मी:-इश्श्य,न पडायला काय झालं 😁 ती:-अग,सकाळ संध्याकाळ,1-1तास चालल्याशिवाय बरं नाही वाटतं !!! मी:-अग मग गच्चीत फे-या मार.घरात येऊन ज्यूस पी आणि कट्ट्यावर बसून गप्पा मारायला,मला फोन कर 😀 या परिस्थितीत सुध्दा,या चिंतातूर माणसांचा,हेकटपणा,'मी'पणा सुटत नाही.यांना दैनंदिन जीवनात, जरासुद्धा बदल चालत नाही. मला जरा,स्वत:चा अभिमानच वाटला.आम्ही ही घरबंदी,नुसती स्वीकारली नाही,तर enjoy करतोय.सगळे घरात.डब्याची घाई नाही.दमून आलेल्यांची वाकडी तोंडं नाहीत.प्रत्येकाला कामं वाटून दिलेली.वेळच वेळ.जमलं तर व्यायाम,फे-या,नाहीतर नुसत्या गप्पा.त्यात दूरदर्शनवर जुने कार्यक्रम, फेसबुक लाईव्ह,यू ट्यूबवर विडियोंची रेलचेल.आता घरोघरी, पुरूषांना पण, वरणफळं,उपमा,उकड,हे पदार्थ आवडू लागले आहेत,कारण घासायची भांडी कमी होतात ना !!!! अभावातला आनंद,बदललेल्या परिस्थितीचा स्वीकार,वाईटातील त्यातला त्यात चांगलं,बदलातील छोटे-छोटे आनंद, विनोदी अंगाने विचार करण्याची सवय ,हे सगळं आपण विसरत चाललोय. "मला असंच लागतं","माझं याच्याशिवाय पान हलत नाही"या सगळ्या तंत्रांमध्ये,साध्या साध्या गोष्टींमधला आनंद आपण हरवत चाललो आहोत. मैत्रिणी भेटल्या की,घरचा विषय न काढता, सहवासातील आनंद घेणं, किती छान असतं हे ,या घरबंदीच्या काळात प्रकर्षाने जाणवू लागलंय ना ? तरी पण बंदी उठल्यानंतर, पहिल्यांदा भेटलो की ...... स्व.अभियान:-अग, आमच्या कमलकडून,सगळी साफसफाई करून घेताघेता,इतका उशीर झाला ग, सॉरी.दमले ग अगदी !!!!! घुमाबाई:-मला बाई,तासभर वॉक घेतल्याशिवाय चैनच पडत नाही 😧. किती घाम आलाय ग.... 😝😀😁😁 शैला परांजपे 15 एप्रिल 2020